कोरोना महामारीच्या संकटातही लाचखोरी सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:11 AM2021-05-31T11:11:11+5:302021-05-31T11:11:17+5:30
Bribe Cases in Washim : वाशिम जिल्ह्यात गत वर्षभराच्या काळात लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार जणांना जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट सर्वत्र तीव्र झालेले आहे. वाशिम जिल्ह्यातही संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ३० हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले. असे असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यात गत वर्षभराच्या काळात लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार जणांना जेरबंद केले. यामध्ये महसूल विभाग अग्रस्थानी आहे.
प्रामुख्यासने शासकीय कार्यालयांमध्ये काम अडल्यानंतर तसेच शासकीय कंत्राटदार व इतरांची देयके अदा करण्यासाठी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जाते. अशा लाचखोरांवर कारवाई करण्यासाठी वाशिममध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. गेल्या १३ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट ठाण मांडून असल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाजही तुलनेने कमी प्रमाणात सुरू आहे. यामुळे अनेकांची महत्वाची कामे अडलेली आहेत. ही कामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या चार जणांवर २०२१ या वर्षात वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे.
सर्वात जास्त कारवाया वाशिम तालुक्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२० आणि २०२१ या दोन वर्षात सर्वाधिक कारवाया वाशिम तालुक्यातच केल्याची माहिती समोर आली आहे. उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये ८ पेक्षा अधिक लाचखोरांना अटक करण्यात आली असून त्याखालोखाल रिसोड, कारंजा तालुक्यातील लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचे भीषण संकटात असतानाही लाचखोरी मात्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जो-तो हैराण आहे; मात्र अशाही बिकट परिस्थितीत काही शासकीय अधिकारी व कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारींवरून लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने तातडीची पाऊले उचलून लाचखोरांना जेरबंद केले आहे.
- एस.व्ही. शेळके उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम