पेडगावचा लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात; सहा दिवसांत दूसरी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:18 PM2020-02-15T19:18:37+5:302020-02-15T19:19:07+5:30
तक्रारदारास मागितली दोन हजारांची लाच
वाशिम : वाटणीपत्रानुसार शेतीचा फेरफार व सातबारा उताºयावर नावाची नोंद करून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन हजारांची लाच स्विकारणाऱ्या पेडगाव (ता.रिसोड) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवार, १५ फेब्रूवारी रोजी रिसोड येथून रंगेहात जेरबंद केले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाच्या नावे पेडगाव शिवारात एकत्र शेतजमिन आहे. ती वाटणीपत्रानुसार वेगवेगळी करण्यात आली. त्याचा जमिनीचा फेरफार व सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पेडगाव येथील प्रभारी तहसीलदार मुगूटराव कुंडलिकराव जाधव (वय ५१ वर्षे) यांनी दोन हजारांची लाच मागितली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली.
‘एसीबी’च्या चमुने तलाठी जाधव यांच्या गजानन महाराज नगर, साईग्रिन पार्क, रिसोड येथील राहत्या घरावर पाळत ठेऊन तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्विकारताना तलाठी जाधव यांना रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचाºयांनी केली.