इंझोरी-पिंपळगाव पाणंद रस्त्यावरील पूल दुर्लक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:22+5:302021-07-07T04:51:22+5:30
मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने ...
मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकऱ्यांची वाट बंद झाली. या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांनी निवेदन देत, आंदोलने करीत पाणंद रस्त्यावर पूल उभारण्याची मागणी केल्यानंतर पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा झाली. तथापि, २०१९ च्या अखेर धो धो कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची वाट बंद झाली. यामुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यांबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊनही गेल्या पाच महिन्यांपासून या पुलाच्या दुरुस्तीची तसदी घेण्यात आली नाही.
^^^^
बियाणे, खतांची डोक्यावरून वाहतूक
इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्यानंतर या रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टरसारखी वाहने नेणेच काय, तर पायी जाणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे, खतांसह फवारणी आणि इतर कामांसाठी आवश्यक साहित्य डोक्यावर न्यावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामानंतर रबी हंगामातही या मार्गावरील शेतकऱ्यांना महिनाभर हा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. आता पुनर्वसन विभागाने या पुलाची तातडीने दखल न घेतल्यास शेतकरी आंदोलन करण्याची शक्यताही आहे.
______________