वाशिमच्या काटेपुर्णा नदीवरील पुल अवजड वाहतूकीस बंद !
By संतोष वानखडे | Published: September 20, 2023 06:19 PM2023-09-20T18:19:10+5:302023-09-20T18:19:26+5:30
काटेपुर्णा नदीवरील पुलावरुन होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, ६ चाकी मालवाहतूक गाडया या पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे.
संतोष वानखडे
वाशिम : मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा नदीवरील पूल क्षतीग्रस्त असल्याने वाहतूकीस बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी (दि.२० ) जारी केले. नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी या महामार्गावरील काटेपुर्णा नदीवर असलेल्या पुलाला खड्डे पडले आहे. त्यामुळे हा पुल क्षतीग्रस्त अवस्थेत आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून सन २०२१ मध्ये पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार या पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत हा पुल सर्व प्रकारच्या अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे सूचविले आहे.
काटेपुर्णा नदीवरील पुलावरुन होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, ६ चाकी मालवाहतूक गाडया या पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. हा महामार्ग बंद राहणार असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुक वळविण्यात येत आहे. हा पुल पुन:श्च वाहतुकीकरीता सुरु करण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करेपर्यंत १९५१ चे कलम ३३( १)(ख) नुसार सर्व अवजड वाहतुक बंद राहणार आहे. अवजड वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग- मालेगांव जहाँगीर ते शेलुबाजार- समृध्दी महामार्ग आणि मालेगांव जहाँगीर ते वाशिम-मंगरुळपीर- शेलुबाजार/ कारंजा राष्ट्रीय महामार्ग १६१ व १६१ ई चा वापर करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आदेशातून केले.