सूसंस्कार घडवून तीन कन्यांचे भविष्य केले उज्ज्वल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:44+5:302021-06-20T04:27:44+5:30
शेलूबाजार : भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातोय. या वृत्तीला तडा देणारी ...
शेलूबाजार : भारतीय संस्कृतीत आजही मुलगा हाच वंशाचा दिवा मानून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातोय. या वृत्तीला तडा देणारी अनेक उदाहरणेही आहेत. असेच एक उदाहरण मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे पाहायला मिळते. तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांनी मुलाचा हट्ट न करता आपल्या तीन मुलींवर सुसंस्कार करून त्यांना उच्चशिक्षण देत पोलीस खात्यात दाखल करून समाजासमोर आदर्श निर्माण केला तऱ्हाळा येथील नारायण प्रल्हादराव वाघमारे हे शेतमजूर आहेत. आधीच घरी गरिबी असताना त्यांच्या घरात तीन मुलींनी जन्म घेतला. प्रिया (२४), भाग्यश्री (२१) आणि श्रद्धा (१९) अशी त्यांची नावे. नारायण वाघमारे यांनी कधीही मुलींचा अव्हेर केला नाही. त्यांच्यावर राग काढला नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे त्यांचा कामासाठी आधारही घेतला नाही. अगदी लाड कौतुकाने या तिघींचा सांभाळ केला. त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले, पोटाला चिमटा देऊन त्यांना शिक्षण दिले. यासाठी पत्नीचेही त्यांना सहकार्य लाभले. हलाखीच्या स्थितीत पित्याकडून होणारे लाडकौतुक आणि संस्कारांचा मुलींवर सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी तऱ्हाळा येथे प्राथमिक, तर शेलूबाजार येथे माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी मंगरुळपीर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात २०१३ या पोलीस भरतीत प्रिया शिपाई पदासाठी पात्र ठरली. थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत भाग्यश्री आणि श्रद्धानेही पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि २०१८ च्या पोलीस भरतीत या दोघींचीही शिपाई पदासाठी निवड झाली. सद्यस्थितीत प्रिया ही मंगरुळपीर उपविभागांतर्गत आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये, तर भाग्यश्री आणि श्रद्धा या दोघी अकोला येथे कर्तव्य बजावत आहेत.
--------------
तिघीनेही घेतले पदवीपर्यंतचे शिक्षण
नारायण वाघमारे यांच्या मुली प्रिया, भाग्यश्री आणि श्रद्धा यांनी केवळ नोकरीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच शिक्षण घेतले नाही. प्रत्यक्षात शिक्षणाचाही एक दर्जा असावा. समाजात वावरताना अभिमानाने सांगता यावे, तसेच ज्ञानात भर पडावी म्हणून त्या तिघींनीही पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
----- कोट:
सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेही स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दाखविलेल्या मार्गानुुसारच मी तिन्ही मुलींवर चांगले संस्कार घडवित त्यांना शिक्षण दिले. त्यांनीही माझ्या भावनांचा मान राखत जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतले. त्यात त्यांना यश आले. माझ्या तिन्ही मुलींचा मला सार्थ अभिमान आहे.
-नारायण वाघमारे (पिता),
तऱ्हाळा, ता. मंगरुळपीर