घरकुल, शौचालयासाठी दलालांकडून लाभार्थींची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 04:31 PM2020-08-09T16:31:26+5:302020-08-09T16:31:34+5:30
आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली.
रिसोड : घरकुल, शौचालयाचे अनुदान काढून देतो, असे म्हणत ग्रामीण भागात दलालांकडून लाभार्थींची लूट सुरू असल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते तसेच घरकुल योजनेसाठी सव्वा ते दीड लाखादरम्यान अनुदान मिळते. रिसोड तालुक्यात अनेक लाभार्थींना घरकुल व शौचालयाचे अनुदान मिळाले नाही. ही संधी साधून ग्रामीण भागात दलालांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याचे समोर येत आहे. घरकुल व शौचालयाचे अनुदान काढून देतो तसेच नव्याने घरकुल, शौचालयसुद्धा मंजूर करून घेतो, असे आमिष दाखवून लाभार्थींकडून दोन ते दहा हजार रुपये उकळले जात आहेत. ज्या लाभार्थींचे नाव अनुदानाच्या यादीत आहे, अशा लाभार्थींच्या घरी जाऊन तुमचे नाव यादीत असून, लवकरच अनुदान काढून देतो, कागदपत्रात काही त्रुटी असल्या तरीसुद्धा वरिष्ठांशी बोलून तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा करून देतो, असे आमिष दलालांकडून लाभार्थींना दाखविले जात आहे. याकडे पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.
काही दलालांकडून लाभार्थींना आमिष दाखवून लुबाडणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. लाभार्थींनी घरकुल व शौचालय अनुदानासाठी कोणत्याही दलालाशी संपर्क साधू नये तसेच कुणालाही पैसे देऊन नये. घरकुल, शौचालयसंदर्भात प्रशासनाशी थेट संपर्क साधावा.
- गिता संजय हरिमकर
सभापती, पंचायत समिती रिसोड