एमपीएससी पास होऊन 'त्यानं' पूर्ण केली शहीद भावाची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 04:12 PM2018-04-26T16:12:55+5:302018-04-26T16:12:55+5:30
शहीद भावाला वाहिली अनोखी श्रद्धांजली
वाशिम : देशासाठी वीरमरण पत्करलेल्या भावाची इच्छा पूर्ण करुन पवन रामचंद्र ढोके या विद्यार्थ्यानं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. पवन ढोके यांची मोटार वाहन निरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. वाशिममध्ये राहणाऱ्या पवन यांचा भाऊ संतोष ढोके यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलं. पवननं मोठं होऊन एमपीएमसी परीक्षा उत्तीर्ण व्हावं, ही संतोष यांची इच्छा होती. त्यांनी वेळोवेळी पवनला मार्गदर्शनही केलं होतं. आज पवननं भावाचं स्वप्न पूर्ण केलंय. पवनचं हे यश पाहायला भाऊ संतोष आज हृयात नाहीत. मात्र तरीही पवननं एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत भावाला अनोखी श्रद्धांजली वाहिलीय.
शेतकरी कुटुंबात वाढलेले संतोष ढोके सैन्यदलात भरती झाले. पवननं उच्च शिक्षण चांगली नोकरी करावी, असं त्यांचं स्पप्न होतं. त्यासाठी संतोष पवनला वेळोवेळी मार्गदर्शनही करायचे. मात्र २०१२ मध्ये हरियानातील टुरिंगमध्ये संतोष शहीद झाले. मात्र दु:ख बाजूला सारुन पवन ढोकेनं मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. यानंतर त्यानं सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी एप्रिल २०१७ मध्ये एमपीएससीची पूर्व परिक्षा पास दिली आणि चांगलं यशही मिळवलं.
ऑगस्ट २०१७ रोजी पवन मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला. सर्व चाचण्या झाल्यानंतर त्याची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. या पदावर नियुक्ती मिळवून पवन ढोकेनं त्याच्या शहीद जवान भावाची इच्छा पूर्ण करुन त्याला खरी श्रध्दांजली अर्पण केली. पवन त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय शहीद जवान भाऊ संतोष ढोके आणि आई-वडिलांना देतो.