भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. तुम्ही गावाकडे कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:39+5:302021-01-08T06:12:39+5:30
वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. ...
वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. गावाच्या वेशीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील व्यक्तीला गावात येऊ दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान करावे, यासाठी उमेदवार आता मात्र भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारू लागल्याने बाहेरगावी असणारी ही मंडळी चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.
गावाकडे रोजगार निर्मिती होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात रोजगार हरवल्यामुळे महानगरांमध्ये हतबल झाली होती. त्यामुळे त्यांची पावले आपसूकच गावाकडे वळण्याच्या मन:स्थितीत असतानाच कोरोना लॉकडाऊनच्या काळात या बाहेरगावाकडील मंडळींना स्वतःच्या गावातच येण्यापासून रोखण्यात आले होते. यामध्ये गावातील पुढारी मंडळी प्रामुख्याने समोर होती. त्यांच्या गावात येण्यावर अनेक मंडळींनी नाराजीसुद्धा दर्शविली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विरोध करणारी गावातील हीच मंडळी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने दादा, भाऊ, ताई, अक्का तुम्ही गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारीत गावाकडे येण्याची विनवणी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे या गावपुढाऱ्यांना आता शहरी भागातील मतदारांची आठवण येत आहे. त्यामुळे महानगरीत स्थिरावलेल्या या मतदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे.