मुस्लिम बांधवांची सामाजिक बांधिलकी, मिरवणूक थांबवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी
By दिनेश पठाडे | Published: October 9, 2022 03:18 PM2022-10-09T15:18:14+5:302022-10-09T15:18:51+5:30
जुलूस-ए-मुहम्मदी ची भव्य मिरवणूक वाशिम शहरातून रविवार, ९ आॅक्टोबर रोजी काढण्यात आली
दिनेश पठाडे
वाशिम : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद निमित्त वाशिम शहरात रविवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान पाटणी चौकात एक रुग्णवाहिका सायरन वाजवत रिसोडकडे जात असल्याचे लक्षात येताच मुस्लिम बांधवानी मिरवणूक थांबवत सहभागी बांधवांना एका बाजुला केले. त्यामुळे काही क्षणात रुग्णवाहिकेला वाट मिळाली.
जुलूस-ए-मुहम्मदी ची भव्य मिरवणूक वाशिम शहरातून रविवार, ९ आॅक्टोबर रोजी काढण्यात आली. ईद-ए-मिलाद हा सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्ताने मशिदींसह घरे, दुकाने व परिसरात सजावट करण्यात येते. मागील आठवडाभरापासून शहरातील मुस्लीम बांधवांकडून लगबग पहावयास मिळत होती. रविवारी सकाळीच वाशिमात मुस्लीम बांधवांनी मिरवणुकीला सुरुवात केली होती. दुपारी १२ वाजेदरम्यान पाटणी चौकात मिरवणूक आले होती. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांकडून वाहने एका बाजूने चालविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र वाहनांची संख्या आणि वाहनाचालकांच्या घाईमुळे वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. अशातच आलेली रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकणार नाही, याची दक्षता घेत मुस्लीम बांधवांनी रुग्णवाहिकेला वाट मिळावी, यासाठी तत्काळ मिरवणुकीतील नागरिकांना सूचना केल्या, काही जणांनी मानवी साखळी तयार करित रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. सामाजिक बांधिलकी जपत मुस्लीम बांधवांनी वाट करुन दिल्याने रुग्णवाहिका विनाविलंब मार्गस्थ झाली.