बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत गोदामांची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:33 PM2019-03-22T13:33:49+5:302019-03-22T13:33:59+5:30
वाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २० गोदामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला असून, या अभियानांतर्गत अमरावती विभागात ५ गोदामांची उभारणी सुरू करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने १३ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानंतर्गत (एसएमएसपी) ग्रामपांचायत पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ), स्वयंसहाय्यता गट (एसएचजी), अन्नधान्य उत्पादक संघ (सीआयजी), सहकारी संस्था, राज्य शासनाची मान्यता असलेल्या व कृषीक्षेत्राशी संबंधीत असलेल्या उपक्रमांत कार्यरत असलेल्या संस्थांमार्फत ५०० मेट्रिक टन क्षमतेचे बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांची उभारणी करण्याचे शासनाने ठरविले होेते. शंभर टक्के केंद्र पुरस्कृत असलेल्या या अभियानांतर्गत राज्यासाठी ५० युनिटचे लक्षांक देण्यात आले होते. सदर योजनेअंतर्गत ग्रामपाचायत स्तरावर बियाणे प्रक्रिया व साठवणूक केंद्र उभारणीसाठी रक्कम ६० लाख रुपये किंवा प्रत्यक्ष उभारणीस येणाऱ्या खर्चापैकी कमी असलेले अर्थसहाय्य देय असून, केंद्र शासनाच्या २२ जानेवारी २०१८ च्या पत्राद्वारे ही योजना राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचनाही प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात ३ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयातील सुचनान्वये बीज प्रक्रिया केंद्र आणि बियाणे साठवणूक गोदामे उभारण्याबाबत कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या २९ प्रस्तावांपैैकी २० प्रस्तावांना २१ जानेवारी २०१९ च्या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात अमरावती विभागातील ५ प्रस्तावांचा समावेश असून, यात अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक दोन, तर वाशिम जिल्ह्यातील एका गोदामाचा प्रस्ताव आहे. आता या गोदामांच्या बांधकामास संबंधित संस्थांनी सुरुवात केली आहे.
बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत शासनाकडून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या किनखेड येथील संंत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीला ५०० मेट्रिक टनचे गोदाम मंजूर झाले आहे. या गोदामाची प्रत्यक्ष उभारणी संबंधित संस्थेने सुरू केली आहे.
-दत्तात्रय गावसाने,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
वाशिम.