म्हाडाच्या घर बांधणीतून दुर्बल घटक बाद!
By admin | Published: August 11, 2015 12:37 AM2015-08-11T00:37:44+5:302015-08-11T00:37:44+5:30
अमरावती विभाग एकूण ४३ सदनिका.
संतोष वानखड/वाशिम: म्हाडाच्या (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण) स्वस्तातील घर योजनेतून २0१४-१५ या वर्षात अमरावती विभागातील आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गट बाद ठरला आहे. म्हाडाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार, सर्वाधिक सदनिका कोकण व मुंबई विभागात झाल्या असून सर्वात कमी पुणे व अमरावती विभागात घर बांधणी झाली आहे. गृहनिर्माण व संबंधित पायाभूत सुविधा यावरून राज्याच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अंदाज बांधला जातो. गोरगरीब घटकातील कुटुंबांना गृहनिर्माण व पायाभूत सुविधा उपलब्ध होतातच असे नाही. या घटकातील कुटुंबांना घर व पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागात इंदिरा आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा आदी योजनांमधून घरे उपलब्ध करून दिली जातात. नागरी भागात वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्य नागरिकांकरिता परवडणारी घरे बांधण्यास प्रोत्साहन देणे, अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कुटुंबांना घरे बांधून देणे आणि दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना घरे उपलब्ध करुन देणे आदी उद्दिष्टांची पुर्तता करण्यासाठी १९७७ मध्ये म्हाडाची स्थापना करण्यात आली. वाढती लोकसंख्या, मोठी शहरे, आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्ती व जमिनीच्या अवाक्याबाहेरील किंमती अशा विपरित परिस्थितीत स्वस्तातील घरे बांधून देण्याचे आव्हान महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) तसेच शहर व औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र (सिडको) या दोन महामंडळाला पेलावे लागत आहे. नागरी भागात गृहनिर्माण योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी म्हाडा व सिडकोतर्फे भूखंड पाहणी, घर बांधकाम आदी सोपस्कार केले जातात.