स्त्री रुग्णालय इमारतीची विद्युतविषयक कामे रेंगाळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 06:14 PM2019-02-27T18:14:15+5:302019-02-27T18:14:20+5:30
वाशिम : वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत विद्युतविषयक कामे रेंगाळली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत विद्युतविषयक कामे रेंगाळली आहेत. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१८ मध्ये विद्युतविषयक कामांसाठी ३.४९ कोटींच्या वाढीव रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले असून, त्या अनुषंगाने बांधकामाला सुरूवात झाली होती. इमारतीचे जवळपास ८० टक्क्यापेक्षा अधिक बांधकाम झाले असून, वाढीव निधीअभावी विद्युत उपकेंद्र, एक्सप्रेस फिडरची उभारणी, अग्निशमन यंत्रणा, वातानुकुलीत यंत्रणा व अन्य सुविधांची कामे खोळंबली होती. उर्वरीत वाढीव कामासाठी जवळपास ३.४९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या वाढीव रकमेतून विद्युत उपकेंद्र, उच्च दाब व एक्सप्रेस फिडरची उभारणी यासाठी १.८ कोटी, अग्निशमन यंत्रणेसाठी १.७४ कोटी, लिफ्ट उभारणी (उद्वाहन) दोन नग यासाठी ५४.१७ लाख रुपये आणि वातानुकुलीत यंत्रणेसाठी ५३.१८ लाख अशी कामे प्रस्तावित आहेत. चार महिन्यानंतरही यासंदर्भात ठोस कार्यवाही नसल्याने विद्युतविषयक कामे ठप्प आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत विद्युतविषयक कामे विद्युत विभागातर्फे केली जाणार आहेत.