कोळगाव आरोग्य केंद्रासह दोन उपकेंद्रांच्या इमारती धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:35+5:302021-05-21T04:43:35+5:30
मालेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णांमुळे ग्रामीण भागात नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, ग्रामीण ...
मालेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णांमुळे ग्रामीण भागात नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, ग्रामीण भागात कोरोना बाधितांसह इतर आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना उपचारासाठी मालेगाव, वाशीम या ठिकाणी न्यावे लागत आहे. खेड्यापाड्यात गोरगरिबांना गावाजवळच उपचार मिळावेत व त्यांच्यासाठी आरोग्याची सुविधा व्हावी, यासाठी शासनाने मुसळवाडी येथे कोट्यवधी रुपयांची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली, तर आदिवासी बहुलवस्ती असणाऱ्या भौरद व कोळगाव बु. येथे आरोग्य उपकेंद्र इमारती उभारण्यात आल्या. कोट्यवधी रुपयांच्या या सुसज्ज इमारती मागील अनेक महिन्यांपासून तयार आहेत. परंतु, या इमारतीत अद्यापही आरोग्य सेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे कोट्यवधीच्या सुसज्ज इमारती या धूळ खात पडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तालुकास्तरावर कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे ही कर्मचाऱ्यांअभावी बंद आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.