आईचे छत्र हरविलेली वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:05+5:302021-02-06T05:18:05+5:30
भारतासह अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, बांगलादेश आदी देशांमध्ये होणारी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या ४ ते ८ मार्च या ...
भारतासह अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, बांगलादेश आदी देशांमध्ये होणारी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या ४ ते ८ मार्च या कालावधीत श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यात भारताकडून प्रतिनिधित्व करीत असलेल्या महाराष्ट्रातील दोन मुलींमध्ये वृषाली इरतकर हिचा समावेश झालेला आहे. वृषालीच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई आणि भावाचा सन २०१८ मध्ये एका अपघातात मृत्यू झाला. वडिलांनी मात्र शहरातील बाजारात हातगाडी लावून भाजीविक्रीचा व्यवसाय करीत असताना वृषालीला आईची उणीव भासू दिली नाही. वृषालीनेदेखील प्रचंड मेहनत घेतली आहे. पहाटे चार वाजता झोपेतून उठून ती धावण्याचा सराव करते. पुष्पादेवी कला महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला ती शिक्षण घेत आहे. सोबतच वडिलांना हातभार लागावा, यासाठी तिने रिसोड येथेच एका खासगी कार्यालयात नोकरीसुद्धा पत्करली आहे. आठव्या वर्गात असताना तिला शाळेचे शिक्षक सुधीर देशमुख यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. त्या जोरावर तिने आज चक्क भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात स्थान पटकाविले आहे.
........................
बॉक्स :
मैत्रिणींनी मदतीचा हात केला पुढे
वृषाली इरतकर या मुलीला क्रिकेटमध्येच भविष्य घडवायचे आहे; मात्र घरची परिस्थिती जेमतेम आहे. ही बाब लक्षात घेऊन तिच्या अनेक मैत्रिणींनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी तर चक्क गळ्यातील, कानातील दागिने मोडून वृषालीला पैसे पुरविले; मात्र तेवढ्याने भागणार नसून रिसोड शहरातील दानशूरांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे ठरत आहे.