मुख्याध्यापकवर शाळेतच झाडल्या गोळ्या, नेम चुकल्याने थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:23 PM2020-07-24T14:23:17+5:302020-07-24T16:27:57+5:30
मुख्याध्यापकवर झाडल्या गोळ्या, नेम चुकल्याने थोडक्यात बचावले.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम/ मालेगाव : तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे व मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्यावर एका २५ वर्षीय युवकाने गोळ्या झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने आरोपीचा नेम चुकल्याने अनर्थ टळला. फरार होण्याचा प्रयत्न करणारा आरोपी सुशांत समाधान खंडारे (२२) याला मालेगाव पोलिसांनी नाकाबंदी करून तात्काळ अटक केली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अमानी जि.प. शाळेचे केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे, मुख्याध्यापक विजय बोरकर व सर्व शिक्षक स्टाफ हे नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात बसुन होते. सकाळी १०:३० च्या सुमारास सुशांत समाधान खंडारे या युवकाने मुख्याध्यापकाच्या कार्यालयात प्रवेश करून अचानकच केंद्रप्रमुख कानडे यांच्या दिशेने गोळी झाडली. दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना पिस्टलचा घोडा अडकल्यामुळे आरोपी दुसरी गोळी झाडु शकला नाही. वेळेवरच पिस्टलचा घोडा अडकल्याने आरोपीने त्याच्या जवळ असलेली दुसरी पिस्टल काढून पुन्हा गोळी चालवण्याचा प्रयत्न केला असता हा प्रयत्न मात्र शिक्षकांनी प्रसंगावधान राखून हाणुन पाडला.
शाळेवरीलच शिक्षकाने ‘सुपारी’ दिल्याचा आरोपीकडून उलगडा
अमानी येथील जि.प. शाळेत पूर्वी गजानन इंगळे हे मुख्याध्यापक होते; परंतु त्यांचे मुख्याध्यापक पदाचे कामकाज समाधानकारक नसल्याने त्यांच्या जागेवर विजय बोरकर यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली होती. इंगळे यांची शालेय पोषण आहार मध्ये रक्कमही अडकून होती. त्यानंतर विजय बोरकर आणि गजानन इंगळे यांच्यात वारंवार वाद होत होते. या वादामधून शिक्षक इंगळे यांनी आरोपी सुशांत खंडारे याला केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे व मुख्याध्यापक विजय बोरकर यांना जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे आरोपीने माहितीत सांगितले. त्यावरून शिक्षक गजानन इंगळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.