सराफा बाजारात शुकशुकाट; ग्राहकांनी फिरवली पाठ!
By admin | Published: November 13, 2016 02:32 AM2016-11-13T02:32:30+5:302016-11-13T02:32:30+5:30
नोटा बंदचा परिणाम; सोन्याचे दर वधारले.
वाशिम, दि. १२- पाचशे, एक हजाराच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेचे पडसाद बुधवार पासून वाशिमच्या सराफा बाजारात उमटले. सोन्याचे दर ३ ते ४ हजारांनी वाढले. मात्र, बाजारात शुकशुकाट असल्याने व्यापार एकदम ठप्प पडला.
एरवी वाशिमच्या सराफा बाजारात सकाळपासून गर्दी असते. मात्र, बुधवार पासुन बाजार एकदम थंडावला. सराफा व्यापार्यांनी केवळ शंभराच्या नोटा अथवा त्याखालील नोटांमध्येच व्यवहार सुरू ठेवल्यामुळे उलाढालीत कमालीची घट झाल्याचे ओम ज्वेलर्सचे आदित्य वर्मा, विसपुते ज्वेलर्सचे प्रशांत एकनाथ विसपुते यांनी सांगितले.
शासनाने बंद ठरविलेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने अनेक मोठ्या ग्राहकांची पंचाईत झाली. गुरूवारला प्रतितोळा ३१ हजार ४00 रुपयांवर बंद झालेले सोन्याचे दर शहरात शनिवारला वेगवेगळे बघावयास मिळाले. शहरातील प्रत्येक दुकानामध्ये सोन्याच्या दरामध्ये प्रचंड तफावत आढळून आली.
सोन्याच्या दराबाबत अनिश्चिततेचे वातावरण
सोन्याच्या दराबाबत सराफा व्यापारी काहीही बोलायला तयार नव्हते. ओम ज्वेलर्समध्ये मात्र ३३ हजार ३00 रुपये प्रतितोळा दर असल्याचे सांगण्यात आले. शनिवारलाही अनेक नागरिकांनी सराफ बाजारातील मोठ्या व्यापार्यांना बल्कमध्ये सोने खरेदीबाबत विचारणा केल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास ज्वेलर्सकडून नकार देण्यात येत होता. त्यामुळे या धनिकांची चांगलीच पंचाईत झाली.
तीन दिवसांत बसला एक कोटींचा फटका
शासनाने ५00 व १000 रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या चार दिवसापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले. ग्राहक ५00 व १000 रू पयांच्या नोटा घेवून सोने-चांदी खरेदीसाठी येत होते. मात्र हा व्यवहार अडचणीचा वाटल्याने सराफ व्यावसायिकांनी सोने-चांदीचे व्यवहार केले नाहीत. नोटा रद्द करण्याच्या या निर्णयामुळे वाशिमच्या सराफा बाजाराला बुधवार पासुन सुमारे एक कोटींचा फटका बसला, असे सराफा व्यापारी गोविंद वर्मा यांनी सांगितले.