फुकट्या प्रवाशांना दणका; विशेष मोहिमेत २८ हजार वसूल
By दिनेश पठाडे | Published: March 28, 2023 07:50 PM2023-03-28T19:50:50+5:302023-03-28T19:51:01+5:30
अकोला-पूर्णा मार्गावरुन विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही फुकट्यांची संख्या घटत नसल्याचे चित्र आहे.
वाशिम :
अकोला-पूर्णा मार्गावरुन विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही फुकट्यांची संख्या घटत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी(दि.२८) रोजी वाशिम रेल्वेस्थानकावर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत फुकट्यांसह अनधिकृत विक्रेत्यांकडून २८ हजार ४२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाशिम विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रवीण पवार यांनी विशेष मोहीम राबविण्यासाठी तीन तिकिट निरीक्षकांची नियुक्ती केली. त्यांनी मंगळवारी सकाळी आणि दुपारच्या सुमारास स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांची तपासणी केली. अकोला-पूर्णा आणि पूर्णा ते अकोला पॅसेंजर, इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड-अम्ब अंदुरा एक्सप्रेस या गाड्यातून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांची स्थानकावर उतरल्यानंतर तपासणी केली करण्यात आली. यामध्ये ७९ जण विनातिकिट प्रवास करीत असल्याचे आढळून आले त्यांच्याकडून नियमानुसार दंड आकारण्यात आला. विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून २५ हजार ४२० रुपये आणि ३ अनधिकृत विक्रेत्यांकडून ३ हजार असा एकूण २८ हजार ४२० रुपयांचा दंड एकाच दिवशी वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाणिज्य विभागप्रमुख प्रवीण पवार यांनी दिली. विशेष मोहिमेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक सुरेश इंगोले, तिकीट निरीक्षक प्रवीण गोणे, मोहन, रेल्वे सुरक्षा बल सहायक पोलिस निरीक्षक शुक्ला, कॉन्स्टेबल मनोज यांचा समावेश होता.
महिनाभरात २२६० जणांवर कारवाई
अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी आढळून येत असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. मागील महिनाभरात २२६० जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास ७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.