एकाच सचिवाकडे पाच गावांच्या कामाचा बोजा
By admin | Published: June 14, 2014 08:41 PM2014-06-14T20:41:16+5:302014-06-14T23:41:31+5:30
ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.
पांडवउमरा : वाशिम पंचायत समितींतर्गत येणार्या ग्रामसचिवांकडे समान गावांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काही ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.
शासनाच्या कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचविण्याबरोबरच गावाचा विकास साधण्याचे काम ग्रामसचिवांकडे सोपविण्यात आले आहे. वाशिम पंचायत समितींतर्गत एकूण ८४ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे साधारणत: ७0 च्या आसपास ग्रामसचिवांची पदे भरणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत ६१ ग्रामसचिव कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यातही तीन ग्रामसचिवांना कार्यालयीन कामकाजात गुंतविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्यांना मुळ ठिकाणी पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि वाशिम पंचायत समितीमध्ये मात्र जयवंशी यांच्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. पी.एल. माने नामक ग्रामसचिवाकडे सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, माळेगाव, तांदळी शेवई, जनुना अशा पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. पाच गावांचा कारभार पाहताना एकाच कर्मचार्यांची दमछाक होते तर काही ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार देण्यात आला आहे. यामुळे जबाबदारी सोपविताना ह्यभेदह्ण तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रत्येक गाव हे सरासरी ७ किलोमीटर अंतरावर असून मुख्यालयापासून ४ गावाला दररोज भेट द्यायची झाली तर ७0 किलोमीटर जाणे-येणे असा प्रवास एका ग्रामसेवकाला करावा लागतो. शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कामाचे समान वाटप होणे आवश्यक असताना अनेक ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार असल्याने उर्वरीत ग्रामसचिवांकडे प्रकरणांच्या ह्यपेंडींगह्णची संख्या वाढत चालली आहे.
तीन ग्रामसचिव कार्यालयीन कामकाजासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे ५८ ग्रामसेवकांना ८४ ग्रा.पं.ींचा कारभार सांभाळावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजात तीन ग्रामसचिवांना घेतले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कर्मचार्यांना मूळ पदावर जाण्याचे फर्मान सोडूनही पं.स.प्रशासन आपल्याच निर्णयावर ठाम राहत असल्याचे दिसून येत आहे.