‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:38 AM2021-03-02T11:38:57+5:302021-03-02T11:39:49+5:30
Cyber Crime News ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतभर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या इन्स्टाग्राम, फेसबुक या ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. त्यामुळे अपरिचितांची ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारण्यापूर्वी सारासार विचार करावा तथा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सावध राहावे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुकवर सक्रिय असणाऱ्या नागरिकांना अपरिचित मुलींकडून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. ती स्वीकारल्यास हाय, हॅलो होऊन अश्लील व्हिडीओ कॉल घेण्याकरिता विनंती केली जाते. या विनंतीचाही स्वीकार केल्यास समोरून अश्लील व्हिडीओ दाखविण्यात (चेहरा न दाखविता) येतो. हा प्रकार दोन-तीन वेळा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती समोरून तुम्हीही अश्लील व्हिडीओ कॉल करा, अशी विनंती करते. तथापि, फसवणूक व्हायला नेमकी येथूनच सुरुवात होते. ओघाओघात चेहरा दाखवून अश्लील व्हिडीओ कॉल केल्यास तीच रेकॉर्डिंग अवघ्या काहीच वेळानंतर परत पाठवून धमकीचे कॉल्स सुरू होतात. पैशांची मागणी पूर्ण करा; अन्यथा यू-ट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर व्हिडीओ अपलोड करून बदनामी करू, असा इशारा दिला जातो. यू-ट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्याचे सांगून तो रिमूव्ह करण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते.
अशा प्रकारे राज्यातील शेकडो इन्स्टाग्राम, फेसबुक वापरकर्ते गेल्या काही महिन्यांत ‘ब्लॅकमेल’ झाले असून बदनामीच्या भीतीपोटी कारवाई करण्यास अनेक जण धजावत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रामुख्याने इन्स्टाग्राम, ‘फेसबुक’ या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ कॉल्स करून ब्लॅकमेल केले जात असल्याची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस येत आहेत. त्याअनुषंगाने पोलीस प्रशासन व सायबर सेलकडून जनजागृती करणे सुरू आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगून कुठल्याही अपरिचित व्यक्तीला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवू नये किंवा स्वीकार करू नये, हाच त्यावरील प्रभावी पर्याय आहे.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
नागरिकांनी फसवणूक टाळण्याकरिता फेसबुक, इन्स्टाग्रामच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसीचा पर्याय निवडून अनोळखी व्यक्ती फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविणार नाही किंवा फॉलो करणार नाही, असा बदल करा. अनोळखी फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका किंवा व्हिडीओ कॉल घेऊ नका.
- दीपक घुगे, सायबर सेल, वाशिम