‘स्माइल’ योजनेतून मिळणार व्यावसायिक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:35+5:302021-07-01T04:27:35+5:30
या योजनेत १ ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून, यामध्ये एस.एफ.एफ.डी.सी.चा सहभाग ८० टक्के व भांडवल अनुदान २० टक्के ...
या योजनेत १ ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून, यामध्ये एस.एफ.एफ.डी.सी.चा सहभाग ८० टक्के व भांडवल अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेसाठी व्याजदर ६ टक्के असून, परतफेडीचा कालावधी ६ वर्षे आहे. सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. कुटुंब प्रमुखाच्या रेशन कार्डमध्ये सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा ही १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मृत्यू प्रमाणपत्र महानगरपालिका किंवा नगरपालिकेने दिलेले असावे. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहितीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, नालंदा नगर येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे यांनी केले.
...
ही कागदपत्रे जोडणे आवश्यक
स्माइल योजनेतून व्यावसायिक कर्ज मिळण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड, तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरावा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.