व्यापारी, अडत्यांनी पुकारले असहकार आंदोलन!
By admin | Published: July 12, 2016 12:42 AM2016-07-12T00:42:30+5:302016-07-12T00:42:30+5:30
वाशिम जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद ; फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचा व्यापा-यांकडून कडाडून विरोध.
वाशिम : फळे व भाजीपाला नियंत्नणमुक्त करतानाच शेतकर्यांऐवजी खरेदीदाराकडून व्यापार्यांचे कमिशन (अडत) घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी कडकडीत बंद होत्या.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची थेट विक्री करणार्यांना शासनाने सर्व नियमातून सूट दिली. बाजार समितीमध्ये मात्न शेतकर्यांऐवजी ग्राहकांकडून अडत घेण्याचे बंधन घातले. या दुहेरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी व्यापार्यांनी बेमुदत सामूहिक आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून शिरपूरजैन, अनसिंग, राजगांव याठिकाणी उपबाजार समिती अस्तित्वात आहे. व्यापार्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार सोमवारी ठप्प झाले. सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांकडून एकूण रकमेच्या ८ टक्के अडत वसूल केली जाते. मात्र, शेतकर्यांच्या हितास्तव शासनाने शेतकर्यांकडून अडत वसूल न करता ग्राहकांकडून वसुलीचा निर्णय घेतला. त्यास व्यापार्यांनी विरोध दर्शविला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी भाजीपाला, फळे बाजार समितीमध्ये विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडून केले जात आहे.