हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी!

By admin | Published: October 14, 2016 02:33 AM2016-10-14T02:33:45+5:302016-10-14T02:33:45+5:30

शेतक-यांची फसवणूक; बाजार समित्यांमधील प्रकार

Buy soybean at a lower rate than guaranteed! | हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी!

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी!

Next

संतोष वानखडे
वाशिम, दि. १३- शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये हमीभाव दिलेला असतानाही, वाशिम जिल्ह्यासह पश्‍चिम वर्‍हाडातील अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू आहे. परिणामी, शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखी भर पडली.
गत तीन वर्षांपासून पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. यावर्षी निसर्गाची साथ मिळाल्याने पीक परिस्थिती बर्‍यापैकी आहे. मात्र, बाजारभाव कोसळल्याने शेतकर्‍यांची ह्यदैनाह्ण संपता संपेना, अशी परिस्थिती आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा दर होता. आता हा दर २४00 ते ३000 रुपयादरम्यान स्थिरावत आहे. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये क्विंटल, असा हमीभाव दिला. त्यामुळे बाजार समित्यांनी यापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करणे नियमात बसणारे नाही. तथापि, या हमीभावाला धाब्यावर बसवून जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला २४00 ते २६00 असा बाजारभाव दिला जात आहे. हाच प्रकार पश्‍चिम वर्‍हाडातील अन्य बाजार समित्यांमध्येही सुरू आहे. भिजलेल्या सोयाबीनबरोबरच चांगल्या प्रतीच्या सोयाबीनलाही २७00 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची सर्रास लुट सुरू आहे. यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारींची दखल म्हणून गवळी व झनक यांनी जिल्हा उपनिबंधकांना याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकरी प्रशासकीय यंत्रणेसमोर हतबल ठरला आहे.

-हमीभावापेक्षा कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी होत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना केल्या. शेतकर्‍यांची फसगत होऊ नये म्हणून हमीभावाचा नियम डावलणार्‍यांविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांवर अन्याय होत असेल, तर शेतकरी हितार्थ शिवसैनिक वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरतील.
- भावना गवळी,
खासदार, वाशिम-यवतमाळ मतदारसंघ

- शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये क्विंटल, असा हमीभाव जाहीर केलेला आहे. या दरानुसार सोयाबीनची खरेदी होणे आवश्यक आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल.
- ज्ञानेश्‍वर खाडे,

जिल्हा उपनिबंधक, वाशिम.



 

Web Title: Buy soybean at a lower rate than guaranteed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.