आठवड्यातून केवळ एकच दिवस हळद खरेदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:42 PM2019-05-17T16:42:08+5:302019-05-17T16:42:23+5:30
हळदीची आवकही वाढली आहे. मात्र, रिसोड बाजार समितीत आठवड्यात केवळ गुरूवार या एकाच दिवशी हळद खरेदी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : बाजारभावात वाढ झाल्याने हळदीची आवकही वाढली आहे. मात्र, रिसोड बाजार समितीत आठवड्यात केवळ गुरूवार या एकाच दिवशी हळद खरेदी केली जात असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी केली.
रिसोड तालुक्यातील अनेक शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आहेत. हळद या पिकाला बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातील गुरूवार या दिवशी हळद खरेदी केली जाते. अलिकडच्या काळात हळदीच्या प्रति क्विंटल बाजारभाव वाढ झाल्याने आवकही वाढत आहे. साधारणत: १५ दिवसांपूर्वी हळदीला प्रती क्विंटल ५५०० रुपयाच्या आसपास बाजारभाव होते. आता बाजारभावात तेजी आली असून, १६ मे रोजी हळदीला प्रति क्विंटल ६४५० रुपये असे बाजारभाव होते. अन्य बाजार समितीच्या तुलनेत रिसोड बाजार समितीत जास्त बाजारभाव असल्याने गुरूवार, १६ मे रोजी नंदू वाणी रा. कोंडाळा ता. वाशिम येथील शेतकºयाने २५ क्विंटल हळद रिसोड येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणली होती. आवक वाढत असल्याने आठवड्यातील दोन दिवस हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी बाजार समिती प्रशासनाकडे यापूर्वीदेखील केली होती. मात्र, अद्याप आठवड्यातील दोन दिवस हळद खरेदी सुरू झाली नाही, असा दावा संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी केला. आठवड्यातील दोन दिवस हळद खरेदी सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा किंव्हा संचालक मंडळाची सभा बोलावून त्यामध्ये हळद खरेदी आठवड्यात दोन दिवस सुरु करणे याबाबतचा विषय घ्यावा, अशी मागणीही संचालक गाडे व मापारी यांनी केली.
संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुसार हमाल, मापारी, अडते यांची तातडीची बैठक घेण्यात आली असून, या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल.
- विजय देशमुख, सचिव
कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड