वाशिम : ५५ ग्रामपंचायतींच्या ९२ जागेसाठी पोटनिवडणूक! १८ मे रोजी मतदान, राजकारण तापणार
By संतोष वानखडे | Published: April 10, 2023 06:38 PM2023-04-10T18:38:36+5:302023-04-10T18:39:04+5:30
जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या ९२ सदस्य पदाच्या जागेसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार असल्याने गावकीचे राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे.
वाशिम (संतोष वानखडे) : जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या ९२ सदस्य पदाच्या जागेसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार असल्याने गावकीचे राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/ थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकीसाठी ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला. जिल्हयातील ५५ ग्रामपंचायतीच्या एकूण ९२ रिक्त सदस्यांसाठी आणि ५ रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी येत्या १८ मे रोजी निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.
यामध्ये वाशिम तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचा समावेश असून २९ सदस्यांची रिक्त पदे, मालेगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांची रिक्त पदे व १ रिक्त सरपंच पद, रिसोड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या ६ सदस्यांसाठी, मंगरुळपीर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांसाठी आणि १ सरपंच पदासाठी, कारंजा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या १५ रिक्त सदस्यांसाठी आणि १ सरपंच पदासाठी आणि मानोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या २१ सदस्यांसाठी आणि २ सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
या पोटनिवडणुकीमुळे पुन्हा एकदा गावकीचे राजकारण तापणार आहे. संबंधित तहसिलदार हे एप्रिल रोजी तहसिलदार हे १८ एप्रिल रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करतील. १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजतापर्यंत मतदान घेण्यात येईल. १९ मे रोजी मतमोजणी करुन निकाल घोषित करण्यात येईल.