कोबी, टोमॅटोचे दर वाढले; लसूणही महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:39 AM2021-03-08T04:39:22+5:302021-03-08T04:39:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झाला असून सकाळपासून सायंकाळपर्यंत कडक उन्ह तापत आहे. याशिवाय शेतशिवारांमधील जलस्रोतांची पातळीही खालावली ...
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झाला असून सकाळपासून सायंकाळपर्यंत कडक उन्ह तापत आहे. याशिवाय शेतशिवारांमधील जलस्रोतांची पातळीही खालावली आहे. परिणामी, भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे भाववाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारी दिवसभर कडेकोट बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे वाशिम शहरात आज आठवडी बाजार भरला नाही; मात्र सकाळच्या सुमारास काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी पालेभाज्या उपलब्ध करून दिल्या. त्याचा दर मात्र वाढलेला असल्याचे पाहावयास मिळाले. शनिवारीदेखील बाजारात लसूणच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ होऊन १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विक्री झाल्याचे दिसून आले. यासह आले ५० रुपये किलो, टोमॅटो ४०, हिरवी मिर्ची ४०, दोडकी व भेंडी ६०, सिमला मिर्ची ४०, पत्ताकोबी ४०, फुलकोबी ४०, वांगी ४०, बरबटी व आवरा शेंग ४० रुपये किलो, गांजर ४० रुपये; तर मेथी व पालक १० रुपये जुडीप्रमाणे विक्री झाली.
....................
गेल्या दोन आठवड्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. कोरोना संकटामुळे पाटणी चौकात पालेभाज्या मिळत नाहीत आणि शहरात इतर ठिकाणी महागलेला भाजीपाला विकत घेण्याची वेळ सध्या ओढावली आहे. चालू आठवड्यात टोमॅटो आणि दोन्ही कोबींचे दर वाढले आहेत. किराणा साहित्याचे दरही वधारल्याने बजेट विस्कळीत होत आहे.
- प्रमिला शिंदे,
गृहिणी
..................
गत आठवड्यानुसारच चालू आठवड्यातदेखील पालेभाज्यांचे दर तुलनेने वाढलेले आहेत. काही आठवड्यांपूर्वी टोमॅटो आणि कोबीचे दर कमी झाले होते. आता मात्र आवकच कमी झाल्याने हे दरही वाढलेले आहेत.
- विशाल वानखेडे,
भाजी विक्रेता
......................
डाळिंब आणि पपईच्या दरात फारशी वाढ झालेली नाही; मात्र सफरचंद, केळी, द्राक्ष ही फळे परगावहून आयात करावी लागतात. कच्च्या स्वरूपातील असलेल्या या फळांना पिकवून त्यानंतर बाजारात विक्री करावी लागत असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहक संख्या मात्र कमी झाली आहे.
- बाळू राऊत
फळ विक्रेता