उंटअळीसोबतच सोयाबीनवर खोडमाशीचेही आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:21 PM2019-08-13T14:21:51+5:302019-08-13T14:21:56+5:30
सोयाबीन पिकावर सुरूवातीला हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख तथा सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर सुरूवातीला हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यावर किटकनाशक फवारणीच्या माध्यमातून नियंत्रण मिळविणे सुरू असतानाच फुलधारणेच्या अवस्थेत खोडमाशीनेही हल्लाबोल केला आहे. त्यास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनीही दुजोरा दिला. दरम्यान, ओढवलेल्या रोगराईमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यात सरासरी ४ लाख ७०९ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबिनचा राहतो. त्यानुसार, यावर्षीही तब्बल २ लाख ८८ हजार २४८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. दरम्यान, विलंबाने सुरू झाला असला तरी पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सोयाबिनचे पिक चांगलेच बहरले आहे; मात्र सुरूवातीच्या टप्प्यात या पिकावर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील राजगाव, अटकळी, अडोळी, टो, जुमडा आदी गावांमधील पिकांवर या अळ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्कासह किटकनाशकांची फवारणी करणे सुरू केले. ही अळी नियंत्रणात येते न येते तोच गत काही दिवसांपासून पाने, फांदी, खोड पोखरणाºया खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. खोडमाशीमुळे सोयाबिनच्या वाढीवर परिणाम होवून फुले आणि शेंगा कमी प्रमाणात लागतात. शेंगांमध्ये तुलनेने लहान व सुरकुतलेले दाणे भरले जातात. खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास सोयाबिनचे झाड पूर्णत: सुकून मोठ्या प्रमाणात नुकसान होते, अशी माहिती डॉ. विकास गौड यांनी दिली.
दरम्यान, या अळीपासून पिकाला वाचविण्याकरिता शेतकºयांनी वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या सुकतात. त्यामुळे किडग्रस्त झाडे, पाने आणि फांद्यांचा किडींसह नायनाट करावा. खोडमाशीने अंडी घालू नये, यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानंतरच किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहनही शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनी केले आहे.
शेतांमध्ये किटकनाशक फवारणीच्या कामास वेग
यंदा पावसाला विलंब झाल्याने पेरणीची कामे उशीराने झाली. त्यातच आधी हिरवी उंटअळी आणि आता खोडमाशीने सोयाबिनवर हल्ला चढविल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या किडींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी पिकावर किटकनाशक फवारणीच्या कामास चांगलाच वेग आल्याचे पाहावयास मिळत आहे.