जिल्हाभरात जॉब कार्ड नोंदणीसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:07+5:302021-01-25T04:41:07+5:30
वाशिम: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना राबवून मजुरांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. या ...
वाशिम: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना राबवून मजुरांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत जॉब कार्ड वितरणासह कामांच्या मागणीनुसार नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जॉब कार्ड मागणीचे नियोजन करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या असून, जिल्हाभरात जॉब कार्ड नोंदणीसाठी गावनिहाय शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
वाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत १ लाख ९१ हजार मजुरांची नोंदणी झाली असून, त्यांना जॉब कार्डचे वितरणही करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही जिल्ह्यात लाखो मजूर कामांसाठी भटकत आहेत. शासनाच्या विविध योजना राबवून या मजुरांना काम मिळवून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी जॉब कार्ड नोंदणी केली जाणार असून, याचे नियोजन ग्रामपंचायतींकडून करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संंबंधित प्रशासकीय यंत्रणेला देतानाच ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यास सांगितले आहे. यासाठी करावयाच्या अर्जांचे नमुनेही उपलब्ध करण्यात आले असून, मजुरांकडून हे अर्ज भरून घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
--------
समृद्ध गाव स्पर्धेतील गावांना आधार
पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या समृद्ध गाव स्पर्धेत लोकसहभाग आणि श्रमदानाबरोबरच रोहयोतूनही विविध कामे केली जाणार आहेत. ही कामे करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार स्पर्धेत सहभागी गावांतही जॉब कार्ड नोंदणी करून मजुरांना कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या कामांमुळे स्थानिक मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होऊ शकणार आहे. यात सद्यस्थितीत तीन ग्रामपंचायती अंतर्गत शेकडो मजुरांनी जॉब कार्डची मागणी केली आहे.
----
कोट: रोहयो अंतर्गत विविध योजना राबवून मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी जॉब कार्ड नोंदणीचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतींकडून मागणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले असून, ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार संबंधित गावांत जॉब कार्ड नोंदणीसाठी लवकरच शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.