‘कोरोना’मुळे पोहरादेवी येथील रामनवमीची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:36 PM2020-03-14T13:36:57+5:302020-03-14T13:37:26+5:30
जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे दरवर्षी रामनवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. यावर्षी ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २ एप्रिल २०२० रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात १३ मार्च रोजी झालेल्या जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले. बैठकीला जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, तहसीलदार सुनील चव्हाण, उमरी खु.चे सरपंच क. भा. पवार यांच्यासह बंजारा समाजाचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. पोहरादेवी येथे देशभरातून लाखो लोक येतात. सध्या काही राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी यावर्षी रामनवमीला आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करावा. यात्रा रद्द करण्यात आल्याने यावर्षी पोहरादेवी येथे येवून नये. याबाबतचा संदेश देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे प्रतिनिधी महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी यावेळी केले. २ एप्रिल रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार रद्द करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी देवस्थानचे महंत, विश्वस्त व बंजारा समाजाचे प्रतिनिधी यांना केले. जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सुध्दा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका उपस्थितांच्या लक्षात आणून दिला.