उमेदवारांचा फंडा, तिळगुळ घ्या अन् मतदान करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:47+5:302021-01-15T04:33:47+5:30
वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारीला मतदान होणार. या मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येलाच मकर संक्रांतीचा योग आला. ...
वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारीला मतदान होणार. या मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येलाच मकर संक्रांतीचा योग आला. प्रचार कार्यावर मर्यादा आल्या असल्या तरी उमेदवारांना तोंडी प्रचार करण्याची मुभा असल्याने मकर संक्रांतीच्या योगाचा उमेदवारांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसले. निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या काही उमेदवारांनी तिळगुळाची पाकिटे तयार करून ती मतपत्रिकेसोबत वाटली. अर्थात यावेळी कोणीही तिळगुळ घ्या अन् मतदान करा, असा शब्दप्रयोग केल्याचे दिसले नाही. तथापि, या चित्रातून मात्र सर्वत्र अर्थबोध तसाच निघत होता. उमेदवारांच्या या उपक्रमामुळे मतदारांची संक्रांत मात्र गोड झाली. तिळगुळाचे दर गगनाला भिडले असताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारादरम्यान उमेदवारांनी वाटलेल्या तिळगुळामुळे घराघरात तिळगुळाचा गोडवाही निर्माण झाला होता.
-----------------
उत्सवाची परंपरा जपण्याचीही संधी
मकर संक्रांतीच्या उत्सवात घरोघरी तिळगुळ तयार करून ते वाटले जाते. एकमेकांना तिळगुळ वाटत ऋणानुबंध घट्ट करण्याचा प्रयत्न महिला मंडळीकडून या सणात केला जातो. वाढत्या महागाईमुळे यावर मर्यादा आल्या असताना उमेदवारांना मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने ही परंपरा जपण्याची संधीच मिळाल्याचे दिसून आले.
===Photopath===
140121\14wsm_3_14012021_35.jpg
===Caption===
उमेदवारांचा फंडा, तीळगुळ घ्या अन् मतदान करा !