वाहन चालन चाचणीसाठी यंत्र अभियंता मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:04+5:302021-02-26T04:57:04+5:30
दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार मुलांसाठी २०१९ मध्ये एस. टी. परिवहन महामंडळात नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना ...
दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार मुलांसाठी २०१९ मध्ये एस. टी. परिवहन महामंडळात नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना चालक, वाहक प्रशिक्षणदेखील देण्यात आले. अशात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू झाला. यामुळे प्रवासी सेवा ठप्प झाली. मनुष्यबळाचा वापर कमी प्रमाणात होणार असल्याने परिवहन महामंडळाने चालक, वाहक पदातील उमेदवारांच्या पुढील प्रशिक्षणास तात्पुरती स्थगिती दिली. आता गेल्या काही दिवसांपासून प्रवासी वाहतूक सुरळीत झाल्याने १५ फेब्रुवारी रोजी महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या स्वाक्षरीनिशी पारित झालेल्या पत्रान्वये स्थगिती उठविण्यात आली. कोविड काळात ज्या टप्प्यावर प्रशिक्षण थांबले होते, तेथूनच पुन्हा ते सुरू करण्यास मान्यताही दर्शविण्यात आली. त्यानुषंगाने राज्यातील इतर विभागांमध्ये उर्वरित प्रशिक्षण देऊन नियुक्ती प्रक्रिया राबविणे सुरू झाले आहे. मात्र, अकोला विभागात निवड झालेल्या २४ उमेदवारांनी यासंदर्भात विभाग नियंत्रकांची भेट घेतली असता यंत्र अभियंता उपलब्ध नसल्याने प्रशिक्षण देता येणार नाही, असे सांगण्यात आले. परिणामी, निवड होऊनही नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने संबंधित उमेदवारांमधून रोष व्यक्त होत आहे.
......................
कोट :
अकोला विभागांतर्गत निवड झालेल्या २४ उमेदवारांचे प्रशिक्षण यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आता केवळ त्यांची वाहन चालन चाचणी घेणे बाकी आहे. त्यासाठी यंत्र अभियंता यांची आवश्यकता असून, हे पद अकोला विभागात रिक्त आहे. बाहेरून व्यवस्था झाल्यास वाहन चालन चाचणी प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तिचा प्रश्न निकाली काढला जाईल, यासंबंधी वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे.
- चेतना खिरवाडकर
विभाग नियंत्रक, अकोला