कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:31+5:302021-06-25T04:28:31+5:30
जिल्ह्यातील सहाही शहरांसह ग्रामीण भागातही गेल्या काही वर्षांत तुलनेने अधिक आवाज करणारी बुलेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. ही गाडी ...
जिल्ह्यातील सहाही शहरांसह ग्रामीण भागातही गेल्या काही वर्षांत तुलनेने अधिक आवाज करणारी बुलेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. ही गाडी ठराविक वेगाने चालविली तर तिचा आवाज ठिकठाक असतो. मात्र, सायलेन्सरच्या पुंगळ्या काढल्या की तोच आवाज कर्णकर्कश व नकोसा होतो. यासह महामार्गावरून धावणाऱ्या काही ट्रक, कंटेनरलाही कर्णकर्कश हॉर्न बसविण्यात आले. ते पोलिसांना ऐकू येत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
.......................
कर्णकर्कश हॉर्न वाजविले तर...
वाहनांच्या मूळ रचनेत परवानगीशिवाय बदल करता येत नाही. मात्र, अनेक जण मन मानेल तसा बदल करतात.
वाहनांच्या हॉर्नचे किंवा सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद नव्या निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.
.................
कानाचेही आजार वाढू शकतात
शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेल्या कानांना कर्णकर्कश आवाजाने बाधा पोहोचू शकते. विशेषत: दुचाकी वाहने व महामार्गावरून जडवाहतूक करणाऱ्या ट्रक, कंटेनरच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे कानाचे आजारही वाढू शकतात.
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसविणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
.......................
फॅन्सी हॉर्नची फॅशन
वाशिमसह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत वाहनांना फॅन्सी हॉर्न बसविण्याची जणू फॅशन जडली आहे.
कर्णकर्कश स्वरूपातील हॉर्नमुळे समोरच्यांना त्रास होत असेल, याची जाणीव न ठेवता काही लोकांकडून चुकीचा प्रकार अवलंबिण्यात आला आहे.
.................
वाहनचालकांना झालेला दंड
नो पार्किंग झोन - २६ लाख
ट्रिपल सीट - ५ लाख
कर्णकर्कश हॉर्न - ३ लाख
.....................
कोट :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून कर्णकर्कश हॉर्न असलेल्या वाहनांची चाचपणी करण्यात आली आहे. मात्र, वाशिम शहरात तरी फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट नाहीत. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नवरही बहुतांश नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
- नागेश मोहोड,
शहर वाहतूक निरीक्षक, वाशिम