नवरदेवाची कार चढली वऱ्हाडींच्या अंगावर; ७ जखमी, ३ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:34 PM2018-05-11T18:34:43+5:302018-05-11T18:34:43+5:30
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले.
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. यातील तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना कारंजा तालुक्यातील पोहा येथे शुक्रवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
पोहा येथील तुळजाभवानी मंदिरात ११ मे रोजी दुपारी ११ वाजता कारंजा तालुक्यातील बेलमंडळ येथील राजू मनवर यांची कन्या दिक्षा व मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथील महादेव भगत यांचे चिरंजीव सतिश यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी हनुमान मंदिरापासून नवरदेवाची वरात काढण्यात आली. वाजतगाजत ही वरात जात असताना नवरदेव बसलेल्या एमएच-१२, पीक्यू-८४३५ क्रमांकाच्या कार चालकाचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा पाय ब्रेकवरून घसरून अॅक्सीलेटरवर पडला आणि ही कार वरातीत डिजेच्या तालावर नृत्य करणाºया वऱ्हाडींच्या अंगावर गेली. या अपघातात नवरदेवाच्या आईसह ७ जण जखमी झाले. माला धम्माचंद आडोळे रा. भूर ता मंगरूळपीर, लक्ष्मी अरूण इंगोले रा. कोंडोली ता. मानोरा, वंदना महादेव भगत रा. भूर ता. मंगरूळपीर, ज्ञानूबाई मोतीराम मनवर रा. शिरजगाव ता. मंगरूळपीर, जयवंताबाई अंबादास भगत, कोमल सुखदेव अजळे, व वनमाला विठ्ठल आडोळे रा. भूर ता. मंगरूळपीर यांचा जखमी व्यक्तीत समावेश आहे. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर यातील तीन व्यक्ती गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रवाना करण्यात आले.