कारंजा येथे पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:16 PM2017-11-30T23:16:24+5:302017-11-30T23:25:47+5:30
वनविभागातील सागवान चोरी प्रकरणात पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोठडीत असतानाच २९ नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने चादर फाडून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम): वनविभागातील सागवान चोरी प्रकरणात पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, कोठडीत असतानाच संबंधित आरोपीने अंगावर घेणारी चादर फाडून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस जमादार राजेश नंदलाल दिवडिया यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध २९ नोव्हेंबरच्या रात्री आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम ३८० भादंविच्या गुन्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेला आरोपी शाकिर खान युसूफ खान (वय २० वर्षे, राहणार कारंजा) यास न्यायालयाने गुन्ह्यातील अधिक तपासाच्या उद्देशाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, २९ नोव्हेंबरच्या रात्री आरोपी शाकिर खान याने अंगावर घेणा-या चादरीचा काही भाग हाताने फाडून तो स्वत:च्या गळ्याला आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस जमादार दिवडिया यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी शाकिर खान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत. दरम्यान, आरोपीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यास अमरावती येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.