"कॉमर्स" शिकलेल्या तरुणानं "अ‍ॅग्रीकल्चर"मध्ये घडवलं करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 10:40 AM2017-07-19T10:40:33+5:302017-07-19T10:44:40+5:30

केळी, हळदीचे विक्रमी उत्पादन : शिरपूरच्या सचिन सारडांची प्रयोगशिलता सफल

Career created in "Agriculture" learners who learned "commerce" | "कॉमर्स" शिकलेल्या तरुणानं "अ‍ॅग्रीकल्चर"मध्ये घडवलं करिअर

"कॉमर्स" शिकलेल्या तरुणानं "अ‍ॅग्रीकल्चर"मध्ये घडवलं करिअर

googlenewsNext

शंकर वाघ/ऑनलाइन लोकमत
शिरपूरजैन(वाशिम), दि. 19 - जगभरातील जैन बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूरजैन येथे वास्तव्याला असलेल्या एका उच्चशिक्षित युवकाने शिक्षण ‘कॉमर्स’मध्ये घेतले; परंतु ‘करिअर’ शेतीत करून केळी आणि हळदीचे विक्रमी उत्पादन घेण्याचा विक्रम करून दाखविला. त्यांच्या या प्रयोगशिलतेची दखल राज्यशासनाने घेतली असून त्यांना ११ जुलै रोजी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.


सचिन दामोदर सारडा असे नाव असलेल्या या युवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे शिरपूरात दहा एकर बागायती शेती आहे. सचिन आणि सतीश या दोन भावंडांपैकी सतीश हा जन्मत: पोलिओमुळे अपंग असल्याने भेटवस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळतो. त्यातच वडिल दामोदर सारडा यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी सचिनच्या खांद्यावर आली. ‘बी.कॉम’पर्यंत शिक्षण झालेल्या सचिन यांनीही ती स्विकारून शेतीतच करिअर घडविण्याचा निर्धार केला.

पारंपरिक पिकपद्धतीत बदल
सचिन यांचे वडिल दामोदर सारडा हे पूर्वी सोयाबीन, हरभरा आणि तूर यासारखी पारंपरिक पिके घेत असत. त्यात काहीअंशी बदल करत नवीन पीक पद्धतीचा अंगिकार सचिन यांनी केला आहे. सोयाबिनमध्ये तुरीचे आंतरपिक घेवून त्यांनी दोन्हीही पिकांपासून भरघोस उत्पन्न घेतले आहे.

२०१०-११ पासून हळदीचे उत्पन्न!
सचिन सारडा यांनी २०१०-११ मध्ये सरी वरंबा पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली. त्यापासून वाळलेल्या हळदीचे त्यांना एकरी २० क्विंटल उत्पादन झाले. नजिकच्या हिंगोली बाजारपेठेत त्यास आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २०११-१२ या वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये गादी वाफ्यावर हळदीची लागवड केली. त्यापासून एकरी २२ क्विंटल उत्पादन झाले. उत्पादित हळदीचे सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे १ लाख ५७ हजार ५०० रुपये मिळाले. त्यातून एकरी ४५ हजार रुपयांचा खर्च वजा जाता त्यांना १ लाख १२ हजार हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. हळद शेतीतून वर्षागणिक उत्पन्न वाढत चालल्याने हेच आता आमचे मुख्य पीक झाल्याची माहिती सारडा यांनी दिली.

केळीपासूनही मिळविले विक्रमी उत्पादन

सारडा यांच्या शेतात हळदीसोबतच केळीची देखील लागवड करण्यात आलेली आहे. एकरी १७०० झाडांपासून त्यांना दरवर्षी २ ते २.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. .

सारडा यांचा आदर्श घेण्याजोगा
‘बी.कॉम’पर्यंत शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न पळता सचिन सारडा यांनी शेतीलाच सर्वस्व मानले आहे. ते न चुकता कृषी विभाग आणि करडा कृषी विज्ञान केंद्राच्या सातत्याने संपर्कात राहतात. वाशिम जिल्ह्यातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देवून शेतीत काय बदल करता येतील, याच्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असतो. त्यांच्या या काही चांगल्या गुणांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, असाच आहे.


शेतीनिष्ठ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरव!

शेतीत नित्यनेम नवनवीन प्रयोग करणारे प्रयोगशिल शेतकरी सचिन सारडा यांचा त्यांच्या मातोश्रींसह वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देवून राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याहस्ते मुंबईत ११ जुलै रोजी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

Web Title: Career created in "Agriculture" learners who learned "commerce"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.