दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:12+5:302021-06-02T04:30:12+5:30

वाशिम : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. याकरिता त्यांची गावनिहाय माहिती संकलित करून त्यानुसार सूक्ष्म ...

Carry out a special campaign for vaccination of persons with disabilities | दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवा

दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवा

Next

वाशिम : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. याकरिता त्यांची गावनिहाय माहिती संकलित करून त्यानुसार सूक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची गती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ३१ मे रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, संदीप महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाजकल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार व वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करून यापैकी किती दिव्यांग व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, याची माहिती संकलित करावी. ही कार्यवाही तातडीने करून अद्याप लस न घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. जिल्ह्यातील ज्या गावातील एकाही व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीची एकही मात्रा आजपर्यंत घेतलेली नाही, अशा गावांमध्ये लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण, कोरोना चाचणी, कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील सद्यस्थिती, म्युकरमायकोसिस, संस्थात्मक विलगीकरण व नव्याने प्राप्त रुग्णवाहिकेबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.

००००००००

चाचण्यांचे प्रमाण कमी होऊ देऊ नका

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी कोरोना चाचणीचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनाधारक यांच्या नियमित कोरोना चाचण्या तसेच ४५ वर्षांवरील दुकानदार, आस्थापनाधारक यांचे लसीकरण करून घ्यावे. ग्रामीण भागात बाधित व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. शहरी भागातसुद्धा संस्थात्मक विलगीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.

०००

ग्रामीण भागात लसीकरणाचे नियोजन

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, ग्रामीण भागात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच ग्रामीण भागातदेखील जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Carry out a special campaign for vaccination of persons with disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.