पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 05:37 PM2021-07-14T17:37:04+5:302021-07-14T17:37:12+5:30
In case of damage to crops due to rains : तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासकीय यंत्रणेला मंगळवारी दिले.
वाशिम : जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, अतिवृष्टीन पिकांचे जर नुकसान झाले तर तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासकीय यंत्रणेला मंगळवारी दिले. १३ जुलै रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण व पिकांची स्थिती याबाबतचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, येत्या १५ जुलैपासून आठवी ते बारावी पर्यंत शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे, असे सांगून ते म्हणाले, अतिवृष्टीने जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्यात यावे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस देण्यात यावा. यासाठी संबंधित यंत्रणेने व्यक्तीशी संपर्क साधून दुसरा डोससाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करावे. जिल्ह्यात उभारण्यात आलेले प्राणवायू प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, याकडे लक्ष द्यावे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीविषयी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी माहिती दिली.