पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:57+5:302021-07-15T04:27:57+5:30
वाशिम : जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, अतिवृष्टीने पिकांचे जर नुकसान झाले, तर तात्काळ ...
वाशिम : जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, अतिवृष्टीने पिकांचे जर नुकसान झाले, तर तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासकीय यंत्रणेला मंगळवारी दिले. १३ जुलै रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण व पिकांची स्थिती याबाबतचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, येत्या १५ जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे, असे सांगून ते म्हणाले, अतिवृष्टीने जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्यात यावेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस देण्यात यावा. यासाठी संबंधित यंत्रणेने व्यक्तीशी संपर्क साधून दुसरा डोससाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करावे. जिल्ह्यात उभारण्यात आलेले प्राणवायू प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील, त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीविषयी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी माहिती दिली.
०००००००००
आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध ठेवा !
पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. जिल्ह्यात साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तसेच हे आजार पसरू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
०००००००
लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर
जिल्हाधिकारी शण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर दिला जात असून ३ लाख १५ हजार पात्र व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात येईल.