पाण्याच्या बाबतीत गावे समृद्ध व्हावी- डॉ. अविनाश पौळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 05:42 PM2020-03-14T17:42:17+5:302020-03-14T17:42:24+5:30
पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने यापूर्वी घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेऊन ३० गुण मिळविले, अशा राज्यातील १,१३८ गावांमध्ये आता समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्याची सुरूवात १ मे २०२० पासून होणार आहे. यानिमित्त वाशिममध्ये आले असता, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...
समृद्ध गाव स्पर्धेची मूळ संकल्पना काय ?
राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी यापूर्वी तीन वर्षे ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविण्यात आली. त्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने प्रामुख्याने शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्यातील १,१३८ गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली. त्याचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरणाºया गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेतून नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार?
जल व मृद संधारण, जल व्यवस्थापन, वृक्षलागवड, संगोपन व जंगलाची वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम आधार तयार करणे, या सहा घटकांवर आधारित ही स्पर्धा १ मे पासून संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.
समृद्ध गाव स्पर्धेबाबत गावकºयांना प्रशिक्षण दिले जाणार का?
हो, १ मे २०२० पासून राज्यभरातील १,१३८ गावांमध्ये सुरू होणाºया समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष द्यायचे, याबाबत गावकºयांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानुषंगारे १२ केंद्रांवर प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या जातील. प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, रोजगार सेवक, महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले आहे.