होळी, धुलिवंदन उत्सव साधेपणाने साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:39 AM2021-03-28T04:39:05+5:302021-03-28T04:39:05+5:30
वाशिम : होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे ...
वाशिम : होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
होळी सणानिमित्त एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते, परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यात आणखी वाढ होऊ नये, यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवश्यक ती जनजागृती, प्रबोधन करावे. होळी व धुलिवंदन या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. होळी, धुलिवंदन सण गर्दी करून साजरे करता होणार नाहीत, याची खात्री ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीने व नागरी भागात नगरपालिकेने करावी. पोलिसांनी स्वतः परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे व आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी. शिवाय पोलिसांनी स्थानिक संस्थांची मदत मागितल्यास तातडीने मदत करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (१८६० चे ४५) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाही संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावी, असे आदेशात नमूद आहे.