ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण दिवस साजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:41 PM2018-05-02T18:41:12+5:302018-05-02T18:41:12+5:30
वाशिम : केंद्रशासनामार्फत १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभीयान राबविण्यात येत असून याअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.
वाशिम : केंद्रशासनामार्फत १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभीयान राबविण्यात येत असून याअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुषंगाने २ मे रोजी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे किसान कल्याण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे होते. वाशिम पंचायत समिती सभापती गजानन भोने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून छपाई करण्यात आलेल्या घडिपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यामाध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, जमीनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाचन कसे करावे, शेतकरी गट कशासाठी स्थापन करावा, ईनाम योजना आदी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरकर यांनी केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे प्रकल्प व्यवस्थापक आर.एस. कदम यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. के.व्ही.के., करडा येथील शास्त्रज्ञ डॉ. निवृत्ती पाटील यांनी शासनाच्या सप्तसुत्री कार्यक्रमाविषयी माहिती दिली. शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनी येत्या खरीप हंगामातील पिक व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.