कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून श्रीराम नवमी साधेपणाने साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:41 AM2021-04-21T04:41:09+5:302021-04-21T04:41:09+5:30

वाशिम : गतवर्षी राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्व सण, उत्सव हे अत्यंत साधेपणाने व लोकांनी एकत्रित न ...

Celebrate Shriram Navami simply by following the Corona Restrictive Rules | कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून श्रीराम नवमी साधेपणाने साजरा करा

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून श्रीराम नवमी साधेपणाने साजरा करा

Next

वाशिम : गतवर्षी राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्व सण, उत्सव हे अत्यंत साधेपणाने व लोकांनी एकत्रित न जमता केलेले आहेत. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रमाणात गतवर्षीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी श्रीराम नवमी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, यावर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी मोठ्या संख्येने एकत्रित येवून साजरी न करता, हा उत्सव साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा-अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये. मंदिरामधील व्यवस्थापक अथवा विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईटद्वारे उपलब्ध करून द्यावी.

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येवू नयेत. कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिनांकापर्यंत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

Web Title: Celebrate Shriram Navami simply by following the Corona Restrictive Rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.