स्वरानंत रेडिओ केंद्राव्दारे जागतिक रेडिओ दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:38 AM2021-02-14T04:38:54+5:302021-02-14T04:38:54+5:30
यावेळी प्रास्ताविकात स्वरानंत रेडिओ केंद्राचे प्रभारी संदीप देशमुख यांनी रेडिओ केंद्राची वाटचाल व समाजातील विविध घटकांकरिता राबवित असलेल्या कार्यक्रमाची ...
यावेळी प्रास्ताविकात स्वरानंत रेडिओ केंद्राचे प्रभारी संदीप देशमुख यांनी रेडिओ केंद्राची वाटचाल व समाजातील विविध घटकांकरिता राबवित असलेल्या कार्यक्रमाची माहिती विशद करून, कृषीविषयक तसेच विविध मनोरंजन व जनजागृती कार्यक्रम प्रसारण केंद्राद्वारे केले जाते. तसेच शेतकऱ्यांना तज्ज्ञांच्या मदतीने तंत्रज्ञानविषयी कार्यक्रमाची निर्मिती करून रेडिओच्या माध्यमातून नवनवीन माहिती पोहोचवली जाते असे सांगितले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रिसोडचे तहसीलदार अजित शेलार यांनी शासनाचे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता स्वरानंत रेडिओ केंद्र अत्यंत प्रभावीपणे कार्य करत असून याचा लाभ व फायदा यंत्रणेला खूप चांगला मिळत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी तंत्रज्ञानाच्या युगामध्ये रेडिओचे महत्त्व आजही अबाधित असल्याचे सांगितले.
करडा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. एल. काळे यांनी स्वरानंत रेडिओ केंद्राच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचे उपक्रम, सेवा व जोडिला शेतीचे नवनवीन तंत्र अत्यंत कमी वेळात व गरजवंत शेतकरी, ग्रामीण महिला व युवकांपर्यंत प्रभावीपणे प्रसारित होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विषय विशेषज्ञ विस्तार शिक्षण एस.के. देशमुख यांनी रेडिओच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या जनजागृती तसेच याच वेळेतील ग्रामीण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमाल विक्रीकरिता ग्राहक मिळवून दिल्याबद्दल प्रशंसा करतानाच ग्रामस्तरावर ग्राम मित्र व ग्राम सखी यांचे जाळे वृद्धिंगत करून कृषी विज्ञान केंद्राशी जोडल्याबद्दल विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर काळे, तर आभार संदीप देशमुख यांनी मानले.