वाशिम जिल्ह्यात 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करीत रमजान ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:45 PM2020-05-25T17:45:46+5:302020-05-25T17:45:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी, लॉकडाऊनमुळे यावर्षी मुस्लिम समाज बांधवांनी २५ मे रोजी फिजिकल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी, लॉकडाऊनमुळे यावर्षी मुस्लिम समाज बांधवांनी २५ मे रोजी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत घरातच नमाज अदा करीत ईद साजरी केली.
वाशिम : वाशिम येथे दरवर्षी इदगाह मैदान येथे रमजान ईदच्या दिवशी सामुहिक नमाज अदा केली जाते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन व संचारबंदीचे आदेश असल्याने आणि कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता घरातच नमाज अदा करून ईद साजरी करण्याचे आवाहन प्रशासनासह मुस्लिम धर्मगुरूंनी केले होते. त्यानुसार वाशिम शहरासह तालुक्यात घरात नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली.
मालेगाव : रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता सोमवार, २५ मे रोजी झाली. रमजान महिन्यात एका महिन्याचा उपवास केला जातो. बालकापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्व वयोगटातील नागरिक रोजा ठेवून पाचही वेळची नमाज अदा करतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पाचपेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणे योग्य नसल्याने पहिल्यांदा पवित्र रमजानला रात्रीच्या वेळेस मुस्लिम समाज बांधवांना एकत्र येऊन नमाज अदा करता आली नाही. यंदा संपूर्ण पाच वेळेची नमाज घरीच अदा करण्यात आली.
मेडशी : रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मेडशी येथे आपल्या घरात नमाज अदा करीत ईद साजरी केली. प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरातून ‘अल्ला’कडे कोरोना विषाणुचा नायनाट व्हावा याकरिता प्रार्थना करण्यात आली. रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव उपवास ठेवून नमाज अदा करून, पवित्र ग्रंथाचे पठण करतात. यंदा कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर मुस्लिम बांधवांच्या उत्साहावर विरजण पडले. लॉकडाऊनच्या काळात मस्जिदमध्ये पाच जणांना प्रवेश आहे. तरीसुद्धा येथील मस्जिदमधील धर्मगुरूंनी तीन ते चार जणांपेक्षा अधिक कुणाला येऊ दिले नाही. गावातील काही ग्रामस्थांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या.