केंद्रीय विद्यालयाच्या इमारत बांधकामास मुहूर्त मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 03:42 PM2019-12-16T15:42:44+5:302019-12-16T15:43:15+5:30
निविदा प्रक्रियेस होणारा विलंब व जागेच्या भूमिपुजनाबाबत असलेल्या राजकीय उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र शासनाने राज्यातील वाशिम आणि परभणी या दोन जिल्ह्यांना वर्षभरापूर्वी केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची मंजूरी दिली. त्यानुसार, वाशिममध्ये विद्यालयासाठी लागणारी जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिली; तर शासनाकडून १२ कोटींचा निधी देखील मंजूर झाला. असे असताना निविदा प्रक्रियेस होणारा विलंब व जागेच्या भूमिपुजनाबाबत असलेल्या राजकीय उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण अनुभवणाऱ्या वाशिम जिल्ह्यात २०१८ मध्ये ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमाचे धडे देणारे केंद्रीय विद्यालय मंजूर झाले. असे असले तरी विद्यालयासाठी लागणारी प्रशस्त इमारत उभी व्हायला किमान ३ वर्षे लागणार असल्याने हे विद्यालय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जागेतील इमारतीत सुरू करण्यात आले; मात्र ही इमारत अगदीच तोकडी पडत असून वर्गखोल्या सिमीत असल्याने इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचेच शिक्षण सद्या दिले जात आहे. पुरेशा जागेअभावी प्रत्येक वर्गाची एकच तुकडी (४० विद्यार्थी क्षमता) कार्यान्वित करण्यात आली असून पाल्ल्यांच्या भवितव्याची चिंता असलेल्या असंख्य पालकांना या विद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनाने सक्रीय कार्याची प्रचिती देत वाशिमला विद्यालय मंजूर होताच पुढील काही महिन्यातच वाशिम-चिखली रस्त्यावर विद्यालयाकरिता प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. शासनानेही त्यासाठी पहिल्या हप्त्याचा १२ कोटींचा निधी मंजूर केला; मात्र निविदा प्रक्रियेस होणारा विलंब आणि जागेच्या भुमिपूजनासंबंधी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्र्यांनी बाळगलेल्या उदासिनतेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. राज्यातील परभणीत तर अद्यापपर्यंत विद्यालय सुरू करण्यासाठीच जागा मिळाली नसल्याची माहिती आहे. यावरून शिक्षणाच्या बाबतीत शासन खरेच गंभीर आहे का, असा सवाल सर्वच स्तरातून उपस्थित केला जात आहे.
वाशिममधील केंद्रीय विद्यालयासाठी लागणारी जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे; मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने इमारतीचे काम सुरू झालेले नाही. यासंदर्भात सलग पाठपुरावा सुरू असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम