मुख्य कार्यकारी अधिकारी दर मंगळवारी घेणार उद्योजक महिलांची कार्यशाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:27 AM2021-06-23T04:27:09+5:302021-06-23T04:27:09+5:30
वाशिम : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेद मध्ये स्थापित बचत गटातील महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ...
वाशिम : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेद मध्ये स्थापित बचत गटातील महिलांच्या उद्योग, व्यवसायाला चालना मिळावी, अडीअडचणी समजून घेत निराकरण करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून यापुढे दर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिलांची कार्यशाळा भरणार आहे. २२ जून रोजी पंत यांनी कारंजा व मालेगाव येथील बचत गटातील महिलांशी संवाद साधून अडीचणी जाणून घेतल्या.
बचत गटाच्या माध्यमातून महिलादेखील विविध प्रकारच्या उद्योग, व्यवसायात उतरत आहेत. मात्र, असे करताना त्यांनाही काही अडचणींना सामोरे जावे लागते. उद्योग, व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला. दर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्या थेट महिलांशी संवाद साधणार आहेत. बँकेद्वारे मिळणारे कर्ज व उत्पादित केलेल्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न, याबाबत संबंधित विभागाला कार्यवाही करावी अशा सूचनादेखील दिल्या जाणार आहेत. मंगळवारच्या कार्यशाळेला उमेद अभियानाचे जिल्हा सहसंचालक डॉ. विनोद वानखडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे, कारंजा व मालेगाव येथील उमेद अभियानातील कॅडर, कर्मचारी उपस्थित होते.