‘सीईओं’च्या झाडाझडतीत अनियमितता उघड; ‘जल जीवन’च्या कंत्राटदारांना बजावणार नोटीस
By संतोष वानखडे | Published: March 16, 2024 04:42 PM2024-03-16T16:42:07+5:302024-03-16T16:43:50+5:30
या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली.
वाशिम :जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभव वाघमारे यांनी घेतलेल्या झाडाझडतीत जल जीवन मिशनच्या काही कामांत अनियमितता झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी एका कंत्राटदाराला ४ लाख ३४ हजार ४०७ रुपयांचा दंड आकारला तर योजनेचे फलक न लावणाऱ्या व कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले. या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रधान सचिवांमार्फत राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी जल जीवन मिशनच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या सभेत प्रधान सचिवांनी वाशिम जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी ६ मार्च रोजी जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांची एक बैठक घेऊन पाच ते दहा दिवसात सर्व कामे सुरू करणे, कामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावणे लावण्याबाबत निर्देश दिले होते. जल जीवन मिशनच्या कामामध्ये बांधकाम साहित्याचा दर्जा व पाईप लाईनची खोली याबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नसल्याचेही सीईओंनी स्पष्ट केले होते. या बैठकीनंतरही जल जीवन मिशनच्या कामात कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे समोर आल्याने सीईओ वाघमारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून झाडाझडती सुरू केली. १५ मार्च रोजी वरदरी खुर्द आणि नागरतास (ता. मालेगाव) या दोन गावांतील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर पाहणी केली. वरदरी खुर्द या गावासाठी ८९ लाख रुपयांची योजना मंजुर असुन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचे व दिलेल्या मानकानुसार काम केले नसल्याचे सीईओंच्या निदर्शनात आले.
कंत्राटदार नितीन जाधव यांनी वरदरी खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची खोली ९० सीएम ऐवजी ४५ सीएम ठेवली. कार्यस्थळी ठेवण्यात आलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. तसेच योजनेचा माहिती दर्शक फलक मानकानुसार चुकीचा लावला असून त्यावर कलर पेंटिंग ऐवजी रेडियमने अक्षरे लिहिलेली आढळली. या गंभीर बाबींची दखल घेत कंत्राटदाराला नोटीस बजावत चार लाख ३४ हजार ४०७ रुपयांचा दंडही ठोठावला. नागरतास या गावातील १.४८ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली असता पाण्याच्या टाकीच्या बॉटम स्लॅबचे बार उघडे असल्याचे तसेच टाकीच्या आवारातील पाईपलाईनचे काम अंदाज पत्रकानुसार केले नसल्याचे तसेच माहिती दर्शक फलक सुद्धा व्यवस्थित लावला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे कंत्राटदार रवींद्र खडसे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. फलक न लावणाऱ्या ६५ कंत्राटदारांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड तर कामे सुरू न करणाऱ्या ६२ कंत्राटदारांना प्रत्येकी १० हजारांचा दंड आकारण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले.