रिसोड बाजार समितीचे सभापती उगले पायउतार
By admin | Published: October 30, 2014 12:00 AM2014-10-30T00:00:37+5:302014-10-30T00:20:30+5:30
संचालक पदावरील स्थगिती फेटाळली.
रिसोड (वाशिम): रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामराव उगले यांच्या संचालक पदावरील स्थगिती फेटाळल्याचे राज्याच्या पणन मंत्र्यांचे १२ सप्टेंबरचे आदेश २७ ऑक्टोबर रोजी रिसोडमध्ये धडकल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
तत्कालिन सभापती गजानन पाचरणे आणि सभापती श्यामराव उगले यांनी एकमेकांविरूद्ध जिल्हा उपनिबंधक वाशिम, विभागीय सहकार आयुक्त अमरावती, पणन कृषी मंत्री मुंबई, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आदी न्यायालयात प्रकरण समाविष्ठ केले होते. अपात्रतेचे आदेश आणि स्थगिती असे निर्णय दोन्ही बाजूंनी लागत होते. पाचरणे यांनी ४ डिसेंबर २0१३ रोजी उगले हे सेवा सहकारी सोसायटी , धोडप या संस्थेचे सदस्य नसल्यामुळे त्यांना बाजार समितीच्या संचालक व सभापतीपदी राहण्याचा अधिकार नियमबाहय आहे, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक वाशिम यांच्याकडे दाखल केली. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक वाशिम यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन ५ फेब्रुवारी २0१४ रोजी संचालक व सभापतीपदावरुन उगले यांना कमी केल्याचा आदेश पारित केला होता. या विरोधात श्यामराव उगले यांनी विभागीय सहकार आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल करुन पुन्हा स्थगिती मिळविली होती. प्रकरण नंतर राज्याच्या पणन मंत्र्यांच्या दरबारात गेले होते. पणन मंत्र्यांनी सदर प्रकरणाची तपासणी करुन जिल्हा उपनिबंधक वाशिम व सहकार आयुक्त अमरावती यांचे आदेश कायम ठेवून उगले यांना दिलेली स्थगिती १२ सप्टेंबर २0१४ ला फेटाळली. सदर आदेश २७ रोजी जिल्ह्यात धडकल्याने उगले यांना पायउतार व्हावे लागले.