सव्वा दोन कोटी गौण खनिज महसूल वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:44 PM2020-03-01T17:44:57+5:302020-03-01T17:45:02+5:30
आतापर्यंत २५ कोटींपैकी २२.८२ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट गाठले आहे.
वाशिम : सन २०१९-२० या आर्थिक वर्षात गौण खनिज वसुलीतून २५ कोटी रुपयांच्या महसूलाचे उद्दिष्ट असून, २९ फेब्रुवारीपर्यंत २२.८३ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. ३० दिवसांत सव्वा दोन कोटी रुपये महसूल वसूल करण्याचे आव्हान खनिकर्म विभागाला पेलावे लागणार आहे.
शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतुक केली जाते. गौण खनिजप्रकरणी जिल्हा प्रशासनाला महसुल वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला शासनाकडून २५ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट मिळाले आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदा महसूल वसुलीचे उद्दिष्ट तेवढेच आहे. गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावर महसूल विभागातर्फे पथक गठीत केले जाते. या पथकाने आतापर्यंत २५ कोटींपैकी २२.८२ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट गाठले आहे.
जिल्ह्यात काही प्रमाणात निसर्गसंपदा असल्याने गौणखनिज साठा उपलब्ध आहे. त्यात वाळू, मुरुम, माती यांचा समावेश आहे. मात्र, रेतीघाट लिलावाला अद्यापपर्यंत हिरवा कंदील मिळाला नसल्याने लिलाव होऊ शकले नाहीत. चोरट्या मार्गाने वाळूची वाहतुक केली जाते. याविरूद्ध प्रशासनाची कारवाईची मोहिम सुरू आहे. ३० दिवसांत सव्वा दोन कोटी रुपयांचा महसूल वसुल करण्याचे आव्हान खनिकर्म विभागाला पेलावे लागणार आहे.
मालेगाव तालुका माघारला
मालेगाव तालुक्याला ४.५० कोटींचे उद्दिष्ट मिळाले आहे. फेब्रुवारीअखेर केवळ ३८ लाखांचा महसूल वसुल झाला आहे. ३० दिवसांत जवळपास ४ कोटींचा महसूल वसुल करण्याचे आव्हान मालेगाव तहसिल कार्यालयाला पेलावे लागणार आहे. दुसरीकडे वाशिम तहसिल प्रशासनाने जिल्ह्यात सर्वाधिक उद्दिष्ट गाठले आहे. वाशिम तहसिल कार्यालयाला ५.५० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४.९३ कोटींचे उद्दिष्टपूर्ती झाली आहे.