संजय गांधी निराधार योजना विभागात सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:24 PM2021-06-16T17:24:48+5:302021-06-16T17:25:10+5:30
Mangrulpir News : आमदार लखन मलीक यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित ‘बाबूं’ची चांगलीच खरडपट्टी काढली.
मंगरूळपीर : येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सध्या पुरता सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, निराधार, दिव्यांगांना जाणवत असलेल्या समस्यांवरून या मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित ‘बाबूं’ची चांगलीच खरडपट्टी काढली. हा प्रकार येथे १६ जून रोजी घडला.
राज्य शासनाकडून दिव्यांग व्यक्ती, वृद्ध, निराधार, विधवा महिलांसाठी अनुदान योजना राबविण्यात येते. तहसील कार्यालयात यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटण्यात आले आहे; मात्र मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयात असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची लेटलतिफशाही, मुजोरी व दलालांच्या सुळसुळाटामुळे खऱ्याअर्थाने पात्र असलेल्या लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी आमदार मलिक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत १६ जून रोजी मलिक यांनी तहसील कार्यालयात धडक दिली. तहसीलदार तसेच संजय गांधी निराधार योजना विभागातील लिपिकांची यावेळी त्यांनी चांगलीच दमछाक केली. अनुदानासाठी पात्र असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी का दिल्या जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करून लाभार्थ्यांसमोरच अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत जिल्हाधिकारी यांना सुद्धा कळविण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत नितेश मलिक, योगेश देशपांडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मलिकांनी विश्रामगृहाचे कुलूप तोडले
आमदार लखन मलिक हे वरकरणी शांत स्वभावाचे दिसत असले तरी १६ जून रोजी मात्र ते चांगलेच संतापल्याचे पाहावयास मिळाले. कार्यकर्ते व विविध योजनांचे अनेक लाभार्थी हे मंगरूळपीर येथील विश्रामगृहावर आमदार मलिक यांना भेटायला आले होते; मात्र विश्रामगृहावर यावेळी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे आमदारांना बाहेरच ताटकळत थांबावे लागले. शेवटी मलिक यांनी स्वत: पुढाकार घेऊन चक्क विश्रामगृहाच्या दरवाजाचे कुलूप तोडून टाकले व त्यानंतर उपस्थित लाभार्थी व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.