बोगस शिधापत्रिकांना बसणार ‘चाप’!
By admin | Published: May 7, 2017 11:56 PM2017-05-07T23:56:40+5:302017-05-07T23:56:40+5:30
अर्ज नमुन्यात बदल; अनावश्यक मुद्दे वगळले
वाशिम : शिधापत्रिका मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच बोगस शिधापत्रिकांना चाप बसविण्याच्या दृष्टीने अर्जाच्या नमुन्यात बदल करण्यात आले आहेत. या बदलाच्या अनुषंगाने संबंधित लाभार्थींना आता सुधारित नमुन्यानुसार अर्ज सादर करावे लागणार आहेत.
राज्यामध्ये १ मे १९९९ पासून तिहेरी शिधापत्रिका योजना लागू करण्यात आली आहे. पिवळ्या शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिका, शुभ्र शिधापत्रिका असे तीन प्रकार असून, अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे पात्र कुटुंबाला त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार या शिधापत्रिकांचे वितरण केले जाते. पात्र कुटुंबाला त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार शिधापत्रिकांचे वितरण होण्यासाठी शासनाने वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. शिधापत्रिका वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची इत्थंभूत माहिती प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून ६ मे २0१७ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अर्ज नमुन्यात काही बदल केले आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात येणार्या सर्व सेवांबाबतच्या अर्जाचे नमुने एका पानाचे करण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीच दिल्या होत्या. त्यानुषंगाने शासन स्तरावर विचारमंथन झाले आणि शिधापत्रिकेतील अनावश्यक मुद्दे वगळून एकाच पानाचा अर्ज नमुना तयार करण्यात आला. शिधापत्रिकेसाठी एकूण पाच प्रकारचे नमुना अर्ज सादर करता येतात. यामध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी कुटुंबप्रमुखाने भरावयाचा अर्ज, कौटुंबिक शिधापत्रिकेच्या युनिटमध्ये कायम वाढ करण्यासाठी अर्ज, कौटुंबिक शिधापत्रिकेतील युनिट्स कायम स्वरूपात कमी करण्याकरिता अर्ज, शिधापत्रिकेमध्ये पत्ता बदल किंवा अन्य फेरफार करण्याकरिता अर्ज आणि हरविलेल्या, चोरीस गेलेल्या, फाटलेल्या किंवा खराब झालेल्या शिधापत्रिकेच्या बाबतीत दुसरी प्रत मिळण्याकरिता अर्ज, अशा पाच प्रकारच्या अर्जांचा समावेश आहे. शासनाच्या सुधारित अर्ज नमुन्यानुसार वाशिम जिल्हय़ात यापुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
या माहितीचा राहील समावेश!
नवीन अर्जाची किंमत केवळ दोन रुपये अशी असून, यामध्ये एका पानावरच माहिती भरावी लागणार आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय, नागरिकत्व, पूर्ण निवासी पत्ता, कुटुंबातील सदस्य संख्या व प्रत्येकाचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न आणि भरला जाणार एकूण व्यवसाय कर, आयकर किंवा विक्रीकर (विक्रीकर क्रमांक) या महत्त्वपूर्ण माहितीसह शिधापत्रिकेवर अन्नधान्न मिळविण्याचा हक्क स्वेच्छेने सोडू इच्छिता काय, अशा मोजक्याच माहितीचा समावेश नवीन अर्ज नमुन्यात राहणार आहे.